ग्रंथालय / About Library

सभासद व ग्रंथसंख्या (३१ डिसेंबर २०१८ अखेर)

0

एकूण ग्रंथसंख्या

0

नियतकालिके

0

दीपावली विशेषांक

0

एकूण सभासद


संक्षिप्त इतिहास


सुमारे १५० वर्षांचा इतिहास असणारे इचलकरंजीचे ‘आपटे वाचन मंदिर’ हे महाराष्ट्रातील नावाजलेले ग्रंथालय आहे. अव्वल ब्रिटीश अमदानीत इचलकरंजी संस्थानाचे अधिपती श्रीमंत गोविंदराव आबासाहेब घोरपडे यांच्या प्रेरणेने १८७० साली या ग्रंथालयाची स्थापना ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या नावाने झाली. गावातील मखदुमपीर या प्रार्थना स्थळातील नगारखान्यातील सुरवातीची जागा अपुरी पडू लागली तेंव्हा येथील एक सामाजहितैशि वकील रामभाऊ आपटे यांनी राजवाड्यासमोरील स्वतःची जागा वाचनालयास देऊन तिथे इमारतीचे बांधकाम सुरु केले.

तथापि त्यांच्या हयातीत वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले नाही. दरम्यान श्रीमंत गोविंदराव आबासाहेबांच्या अकाली निधनानंतर श्रीमंत नारायणराव बाबासाहेब १८९२ साली अधिकारपदी आले व त्यांनी बांधकाम पूर्ण केले. आपटे वकिलांच्या योगदानाच्या सन्मानार्थ १९१० साली ग्रंथालयाचे ‘आपटे वाचन मंदिर’ असे समारंभपूर्वक नामकरण करण्यात आले.

श्रीमंत घोरपडे सरकारांचे ग्रंथप्रेम व ग्रंथालयास त्यांचे लाभलेले सर्वप्रकारचे औदार्य यामुळे ग्रंथालयाची भरभराट होत गेली. अनेक मौलिक ग्रंथ, दुर्मिळ पुस्तके, विविध विषयांवरील कोशवाड्मय आणि मान्यवरांच्या भेटी, व्याख्याने यामुळे वाचनालयाचे कार्य जोमाने सुरु राहिले. संस्थानाच्या विलीनिकरनानंतर ग्रंथालय इमारतीची मालकी राज्यशासनाकडे गेली. १९५३ साली बॉम्बे ट्रस्ट अक्टखाली संस्थेची नोंदणी करण्यात आली. अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर राज्यसरकारने १९८३ साली संस्थेस जागेची मालकी प्रदान केली व त्या जागेवर १९८६ साली संस्थेने स्वतःची नवी प्रशस्त इमारत उभी केली.

दरम्यानच्या काळात १९७० साली शताब्दी सोहळा व पाठोपाठ वसंत व्याख्यानमाला, इतर साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियमित आयोजनास सुरवात झाली.वाचक सभासदांचा प्रतिसाद, राज्यशासनाचे अनुदान व साहित्यिक विचारवंतांचा सहभाग यामुळे वाचनालयाची प्रतिष्ठा वाढली. राज्याचा ‘उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ मिळाला.अलीकडील काळात वाचनालयाची शान वाढवणारे देखणे असे ‘बजाज सभागृह’ बांधण्यात आले आहे.