१९७० साली ग्रंथालयाचा शताब्दी समारोह झाल्यानंतर ‘वसंत व्याख्यानमाला’ उपक्रम आरंभण्यात आला. हा ज्ञानयज्ञ अखंडपणे गेली पन्नास वर्षे चालू असून या व्याख्यानमालेस रसिक वाचकांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. प्रतिवर्षी २ मे ते ९ मे या दरम्यान सुरु असलेल्या या व्याख्यानमालेत अनेक मराठी साहित्य विश्वातील तसेच सांस्कृतिक, सामाजिक चळवळीतील नामवंतांनी पुष्पे गुंफली आहेत. सेतुमाधवराव पगडी, कविवर्य बा. भ. बोरकर, गंगाधर गाडगीळ, ग. प्र. प्रधान यांचेपासून प्रा. राम शेवाळकर, य. दि. फडके, स. गं. मालसे अशा अनेक मान्यवरांनी या व्याख्यानमालेस समृध्द बनवले आहे. आपटे वाचन मंदिराचा हा ज्ञानयद्न्य इचलकरंजी नगरीच्या सांस्कृतिक चळवळीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आज हे ज्ञानसत्र तितक्याच उत्साहाने चालवले जाते. हि व्याख्यानमाला येथील रसिकांसाठी एक वार्षिक पर्वणी समजली जाते.